स्वच्छता मनातली अन् शिवाजी पार्कची!
द्वारकानाथ संझगिरी
7 डिसेंबर 2015
आम्हा शिवाजी पार्कवासीयांना शिवाजी पार्कचं मैदान आणि आसपासचा भाग नेहमी परिटघडीचा लागतो. आणि त्याची अपेक्षा का ठेवू नये ? आमचा तो हक्क आहेच. ही परिटघडी जेव्हा एखादी मोठी राजकीय सभा असते तेव्हा विस्कटते. शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेनिस कोर्टाच्या कुंपणाचा किंवा तिच्या पलीकडे स्काऊट हॉलच्या पलीकडच्या भागाचा उपयोग अशा वेळी बर्याटच वेळा सार्वजनिक मुतारीसाठी केला जातो. त्या वेळी किंवा त्या सभेच्या दुसर्याा दिवशी फिरताना, येणार्या् दुर्गंधीमुळे एखादा निषेधाचा सूर उमटतो. नाही असं नाही, पण तो तसा क्षीण असतो. पण ६ डिसेंबरला शिवाजी पार्कवर जो जनसागर उसळतो, त्या वेळी रोज शिवाजी पार्कला फिरणारी माणसं अदृश्य होतात. चार तारखेला अदृश्य झालेली माणसं आठ तारखेला पुन्हा उगवतात. त्याच्या आसपास जी शब्दफुलं उधळली जातात ती साधारण अशी असतात- ‘‘उद्यापासून पार्कात यायला नको,‘‘ ‘‘उकिरडा बरा रे, अजून दोन दिवस तरी यायला नको होतं,‘‘ ‘‘सर्व हलवा नागपूरला.‘‘ या प्रतिक्रिया फक्त घाणीपुरत्या नसतात. लपलेला जातीयद्वेष त्यातून डोकवायला लागतो. आपल्या देशात कुठेही लाखो लोक जमतात, तेव्हा घाण होतेच. पंढरपुरात लाखो वारकरी जमतात तेव्हा काय तिथे स्वच्छता नांदते ? कुंभमेळ्याच्या वेळी नाशकात काय झालं होतं? साध्या क्रिकेट मॅचच्या वेळी स्टेडियममध्ये मुतारीत शिरवत नाही. मला आठवतंय, संस्कारक्षम वयात मी सांगलीला गेलो होतो. त्या काळी टोपलीचे संडास होते. शौचाला बसत असताना मला जाणवलं की खालून कुणीतरी टोपली काढतंय आणि नवी टोपली ठेवतंय. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एक काळा कृश माणूस ती मैल्याची टोपली डोक्यावरून घेऊन चालला होता. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यातली घाण त्याच्या अंगावर पडत होती.
समाजातल्या काहींनी पिढ्यानि्पिढ्या डोक्यावरून मैला वाहिला. आम्हाला मैलावरचा मैला एक दिवसही सहन होत नाही. सेल्फकंटेन्ड ब्लॉकमध्ये राहणार्याव शहरी पिढीने हे वर्णन फक्त पुस्तकात वाचलेलं असतं. तेसुद्धा १०-२० मार्कांसाठी. वाचलेलं मेंदूतून पेपरात झिरपतं. मनात कधीच उतरत नाही. त्यामुळे मनू आम्हा शहरी मंडळीच्या मनातून गेलेला नसतो. मीसुद्धा रोज शिवाजी पार्कला फिरायला जातो. मलाही शिवाजी पार्क परिटघडीचं असणं आवडतं. पण आम्हाला दोन-तीन दिवस शिवाजी पार्क बाबासाहेबांच्या अनुयायांना मनापासून देता येत नाही ? तुमचं मन तेव्हढं तरी मोठं असू द्यात.
बरं, अलीकडे शिवाजी पार्कची विस्कटलेली परिटघडी फार चटकन व्यवस्थित होते. त्यासाठी मला वाटतं की, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांडचं कौतुक करायलाच हवं. मुंबई महानगरपालिका, पालिकेचे कर्मचारी, इंजिनीअर्स हे बर्याचचवेळा लोकांच्या आणि मीडियाच्या दृष्टीने टीकेचा विषय असतात. चॅनेलवाले तर गेल्या २६ जुलैनंतर जरा मोठा पाऊस पडून एखाद्या सखल भागी पाणी तुंबलं की, मुंबई महानगरपालिकेच्या नावाने शिमगा करतात. पाणी तुंबल्यानंतर इतर कारणांचा कुणी विचार करीतच नाही. मला असं वाटतं की, खून, बलात्कार, भ्रष्टाचार, क्रिकेटपटूंचं अपयश ही जशी बातमी होते तशी चांगलं काम हीसुद्धा बातमी होऊन ती हायलाईट करायला हवी.
गेल्या दोन दिवसांत शिवाजी पार्कची परीटघडी हाताबाहेर विस्कटली जाणार नाही यासाठी जी नॉर्थचे वॉर्ड अधिकारी अश्विन खानोलकर यांच्या टीमने जे काम केलंय त्याची वाखाणणी व्हायला हवी. या वेळच्या महापरिनिर्वाण दिवसाची गोष्ट तर निराळी होती. हे महापरिनिर्वाणाचं पन्नासावं वर्ष! नेहमी चैत्यभूमीवर दर्शनासाठी पाच लाख भक्त येतात. या वेळी १० ते २० लाखांची अपेक्षा होती. त्यात खैरलांजी प्रकरण, मग ते कानपूर प्रकरण, त्यामुळे चिडलेली, पेटलेली मनं. पण अश्विन खानोलकरांनी विशेष प्लॅनिंग करून सर्व सुखसोयी पुरवल्या. शिवाजी पार्क हे जवळजवळ ७० हजार स्क्वेअर मीटर्सचे आहे. त्यात तिथे राहायला येणार्याा साधारण ७०-८० हजारांच्या फ्लोटिंग पॉप्युलेशनसाठी २१ हजार स्क्वेअर मीटर्सची जागा तंबू ठोकून उपलब्ध करून दिली. त्या मंडळींचं खाणं-पिणं, पुस्तक, कॅसेटची विक्री, मेडिकल सुविधा वगैरेंसाठी तब्बल ४५० स्टॉल्स उभारले गेले. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये अनेक गट आहेत. त्या विविध गटांना मीटिंगसाठी, चर्चेसाठी वगैरे चार वेगवेगळे मंडप घालून मीटिंगच्या जागेची सोय केली गेली. शिवाजी पार्कवर कुठलीही मीटिंग, कार्यक्रम वगैरे असला की क्रिकेटच्या पिचचं नुकसान होतं. ते टाळण्यासाठी सातच्या सात खेळपट्ट्या या पॉलिथिनच्या कव्हर्सनी झाकण्यात आल्या.सर्वात महत्त्वाचा भाग असतो हा दुर्गंधीचा- घाणीचा- धुळीचा! धूळ उडू नये म्हणून तंबू आणि स्टॉल्समध्ये कार्पेटस् टाकली गेली आणि जिथे मोकळी जागा आहे तिथे तर तीन-चार तासांनी पाणी मारून धूळ उडणार नाही हे पाहिलं गेलं. या वेळी वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पाण्याचे ३०० नळ पुरविण्यात आले. त्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सिस्टीम उभारली गेली. तब्बल एकशेवीस मोबाईल शौचालये उभारून, त्या सांडपाण्याचा निचरा हा ड्रेनेजच्या तात्पुरत्या पीव्हीसी पाइपातून सीवेजच्या ड्रेनेजमध्ये करण्यात आला. तिथे येणारी मंडळी ही तशी आपल्या समाजाने गावकुसाबाहेर भिरकावलेली गरीब मंडळी असतात. त्यांना हॉटेलात जेवण परवडत नाही. एक तर मोफत अन्नदानाच्या स्टॉलवर रांग लावायची किंवा जेवण तयार करायचं. उरलेल्या अन्नामुळे जास्त दुर्गंधी येते. ती टाळण्यासाठी शिवाजी पार्कचे नऊ विभाग पाडण्यात आले. त्या प्रत्येक विभागासाठी एक ज्युनियर ओव्हरसियर. त्याच्या हाताखाली सुपरव्हायजरी स्टाफ आणि पंचवीस मजूर देण्यात आले. त्यांचं काम ? चार तारखेपासून सात तारखेपर्यंत राऊंड द् क्लॉक स्वच्छता ठेवणे. त्यांना वेगळ्या रंगाचे कपडे आणि जॅकेटस् देण्यात आले. आमचं शिवाजी पार्क परिटघडीचं ठेवण्यासाठी केलेला हा भगीरथ प्रयत्न आहे. त्यासाठी साधारण एक कोटी रुपये खर्च होतील.
सात तारखेपासून सकाळी स्टॉल्स, नळ-संडास वगैरे हलवायला सुरुवात होईल. सात सारखेला संध्याकाळी शिवाजी पार्क पूर्ववत करण्याचा प्रयत्न होईल. क्षणात शिवाजी पार्क स्वच्छ होऊ शकत नाही. तशी जादूची कांडी आज विज्ञानाकडेही नाही. कुठेतरी, काहीतरी दुर्गंधी राहीलही, पण प्रयत्न महत्त्वाचा आहे. पुन्हा आम्ही मंडळी सकाळ-संध्याकाळ शिवाजी पार्कला आमच्या कॅलरिज कमी करीत फेर्याआ मारू. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्या फेर्या मारताना आमच्या मनात कुठंही दुर्गंधी नसावी. कारण शिवाजी पार्कच्या गवतावरची दुर्गंधी काढून टाकता येते. माणसाच्या मनातली दुर्गंधी काढण्यासाठी महापुरुष जन्माला यावा लागतो. महाराष्ट्रात अनेक महापुरुष जन्माला आले, पण आमची मनं अजून हवी तेवढी स्वच्छ झालेली नाहीत ती ज्या दिवशी होतील तेव्हाच शिवाजी पार्कवरच्या गवताच्या दुर्गंधीचा वास आम्हाला येणार नाही.
No comments:
Post a Comment