आज पहाटे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात फिरत असताना एक प्रश्न सारखा सतावत होता?
का ही माणसे येतात?
काय मिळतं इथे येऊन?
नीट राहायला मिळत नाही...
धड झोपायला मिळत नाही...
खायला मिळत नाही...
मग इतकी चैत्यभूमीची ओढ का आहे?
लहान बालकं, तरुण मुले-मुली, सफेद वस्त्र परिधान केलेल्या स्त्रिया, म्हातारी माणसं...
झोपायला जागा नाही तरीही तशीच अस्ताव्यस्त पडलेली...
अंथरुण नाही अन पांघरुणही नाही...
कडाक्याची थंडी...
शौचालयाची अपुरी व्यवस्था...
रात्रभर जागून सांगणारे
पुस्तके, फोटो, मुर्त्या, कॅलेंडर यांचे स्टॉल...
१२५ व्या जयंती निमित्त १,२५,००० लोकांचा रक्तदान करण्याचा संकल्प करणारे महाराष्ट्रासह देशभरातून आलेले अनुयायी...
हाता-गळ्यातल्या धाग्यासह खिशातून तंबाखूच्या पुड्या काढणारे २२ प्रतिज्ञा अभियानचे प्रतिनिधी...
पथनाट्यातून लोकांना एकत्र येण्यासाठी सांगणारे तरुण मंडळी...
कोणत्याही पक्षात रहा पण वेळ आल्यावर नेत्याच्या आदेशाची वाट न पाहता समाजासाठी एकत्र या हे ओरडून सांगणारा FAM चा कार्यकर्ता...
काय मिळतं या सर्वांना?
माहित नाही...
मग मी स्वतःलाच प्रश्न केला?
काय मिळतं इथे येऊन?
उत्तर मिळालं...
काय मिळतं म्हणून येत नाही, तर आयुष्यात जे जे मिळालं ते ज्या महामानवामुळे मिळालं त्याला अभिवादन करण्यासाठी येतो...
इतक्या लाखों लोकांमध्ये भीक मागणारी एकही व्यक्ती भेटली नाही... स्वाभिमानी माणसं निर्माण करणारा युगपुरुष जगात दुसरा कुणी झाला नाही अन होणारही नाही... करोडों गोरगरीब जनता असलेला जगातील सर्वात श्रीमंत आपला बाप आजही आपली श्रीमंती टिकवून आहे...
बाबा तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही पण तुम्हाला अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, हि जाणीव सदैव स्मरणात रहावी...
..
आपला भिम सैनिक...बाबासाहेब आकाडे